मुंबई: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या(पीओपी) मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या गणेशमुर्त्यांचे समुद्रात विसर्जनाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठली असली तरी सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत सरकारला भूमिरका मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशमुर्तींच्या विसर्जनाबाबत सरकारची भूमिका निश्चित करण्यासासंदर्भात आज फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर आदी उपस्थित होते.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरकारने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या.
बैठकीत पीओपी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेली मार्गदर्शक तत्वे, न्यायालयाचे आदेश आणि काकोडकर समितीचा अहवाल याबाबात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी, असे आदेश फडणवीस यांनी दिले. तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत, तसेच गणेशमूर्तीं तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा वापर व नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा. उंच व मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढण्यात यावा. तसेच छोट्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे. शाडूच्या व पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून मूर्ती बनविण्यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी सांगितले. तर डॉ. काकोडकर यांनी जल प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यावर भर देण्यात यावा. रासायनिक रंगांमुळे जास्त प्रदुषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करणे, पर्यावरणपूरक साहित्य वापरणे यावर भर देऊन जनजागृती करण्यासंदर्भात त्यांनी सूचित केले. मोठ्या गणशमूर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
काकोडकर समितीचा अहवाल, राष्ट्रीय हरित लवादाची मार्गदर्शक सूचना आणि गणेशोत्सवाची प्रथा परंपरा, विसर्जनाची पध्दती याचा विचार करुन एक सर्वंकष धोरण तयार करण्याचे आदेश आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री