मुंबई : फिजिओथेरपिस्टना त्यांच्या नावा पुढे ‘डॉक्टर’ उपाधी लावण्यास परवानगी देण्याबाबत विविध डाॅक्टरांच्या संघटनांनी विरोध केला आहे. आता फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फाईमा) फिजिओथेरपीस्टना डॉक्टर पदवी देण्याची परवानगी रद्द करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालयाच्या महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्सने फिजिओथेरपीसाठी ‘डॉ’ ही पदवी वापरण्यास एप्रिल २०२५ मध्ये मान्यता दिली. परंतु संचालनालयाने ९ सप्टेंबर रोजी मान्यता रद्द करण्याचे पत्र जारी केले. परंतु २४ तासांच्या आत संचालनालयाने हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे फाईमाने संचालनालयाने मान्यता रद्द करण्याचा निर्णय पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे.
फिजिओथेरपीप्रमाणेच एनसीएएएचपी अंतर्गत ५६ इतर सहयोगी आरोग्य सेवा व्यावसायिक देखील येतात. ऑक्युपेशनल थेरपीस्ट, आहारतज्ज्ञ आदी आरोग्य सेवा व्यावसायिकांनी डॉक्टर ही उपाधी लावण्याबाबत मागणी केली तर देशातील सामान्य लोकांमध्ये डॉक्टरांबाबत संभ्रम निर्माण होईल, असे फाईमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी सांगितले.
पॅरामेडिकल आणि फिजिओथेरपी सेंट्रल कौन्सिल विधेयक २००७ नुसार ‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त आधुनिक औषध, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी औषधांच्या नोंदणीकृत व्यावसायिकांनाच वापरता येईल. नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफसह इतर कोणत्याही श्रेणीतील वैद्यकीय व्यावसायिकांना ही उपाधी वापरण्याची परवानगी नाही. त्यामुळे ही मान्यता रद्द करण्यात यावी, अशी विनंती संचालनालयाकडे केली असल्याचे डॉ. डोंगारदिवे यांनी सांगितले.