लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाकडील ५ लाख रुपये घेऊन पलायन केल्याप्रकरणी पाज जणांना खार पोलिसांनी अटक केली. त्यापैकी दोन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्या दोघांविरोधात मुंबई, नवी मुंबई व मिरा – भाईंदर परिसरात १० गुन्हे दाखल आहेत. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मुख्य आरोपीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अटक करण्यात आली. याप्रकरणी ३ लाख ३० हजार रुपये रोख व गुन्ह्यांत वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली.

वांद्रे परिसरात राहणारे तौसिफ शेख (३७) यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी सोमवारी भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३१८ (४), ३१९ (४), ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. शेख वकील असून त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीची पर्यटन व्यवसाय संस्था आहे. तेथे विमान आणि रेल्वे तिकीटे, पैसे हस्तांतरित करण्याचे कामकाज चालते. संबंधितांना पैसे हस्तांतरित करण्यासाठी रक्कम एकत्र करून कंपनीच्या खात्यात जमा करण्यात येते. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या भावाने पायधुनी येथील दोन खात्यात ५ लाख ७० हजार रुपये भरण्यासाठी दिले. शेख दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे भरण्यासाठी गेले. राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम यंत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यापैकी ७० हजार रुपये रविवारी सकाळी एका ग्राहकाच्या खात्यात जमा केले.

आणखी वाचा- राज्यातील ११ हजार कोटींच्या रस्ते कामासाठी १९ निविदा

त्यानंतर, दुसऱ्या बँकेत रक्कम जमा करण्यासाठी बाहेर येताच एटीएमच्या प्रवेशद्वारावर त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी थांबवले. गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून चौकशीसाठी सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना एका मोटरगाडीत बसवून त्यांच्याकडील पैशांची बॅग तपासून चौकशी सुरू केली. गुन्हा दाखल करण्याची भीती घालून त्यांच्याकडील रोकड काढून घेतली आणि त्यांना सांताक्रूझ परिसरात उतरवले. त्यांनी घडलेला प्रकार भावाला सांगून पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणातील मुख्य आरोपी संदेश मालाडकर (५१) याला सिंधुदुर्ग येथील आचरा येथून मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यांत सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींच्या चौकशीत इतर चार आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार प्रफुल्ल मोरे (४६), विकास सुर्वे (३९), चेतन गौडा (३४) व दर्शन यागनिक (४३) या चौघांना अटक करण्यात आली. मालाडकरविरोधात मुंबई, नवी मुंबई व मिरा-भाईंदर परिसरात ८ गुन्हे दाखल आहेत. तसेच मोरेविरोधात मिरारोड व दहिसर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींना याप्रकरणी न्यायालायपुढे हजर केले असता त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी अशा प्रकारे इतर ठिकाणीही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे.