मुंबई : राज्यभर गणेशोत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण आहे. घरोघरी गणरायाचा जागर होत असून भक्तिमय वातावरणात सारेजण न्हाऊन गेले आहेत. या उत्साहपूर्ण वातावरणात प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरचे ‘बाप्पा मोरया रे’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. आर. किरण लिखित आणि निषाद गोलांबरे याने संगीतबद्ध केलेले ‘बाप्पा मोरया रे’ हे गीत फिनिक्स म्युझिक या युट्यूब वाहिनीवर प्रदर्शित झाले आहे.

‘बाप्पा मोरया रे’ या नव्याकोऱ्या गीतात भक्तीचा सुरेल संगम पाहायला मिळत आहे. या गीताच्या चित्रफितीत ढोल – ताशांच्या गजरातील गणरायाची आगमन मिरवणूक, लहान – मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावरील आनंद, तसेच विसर्जनावेळी गणरायाला निरोप देताना भरून आलेले डोळे आदी विविध भावना गाण्यात अतिशय सुंदररित्या दाखवल्या आहेत. या गाण्याची निर्मिती आर. किरण यांनी केली असून अंकित शिंदे, दिव्या घाग, रुपेश पावस्कर हे कार्यकारी निर्माते आहेत. पराग सावंत यांनी संकलनाची जबाबदारी पेलली आहे, तर फिल्मी आऊल स्टुडिओने प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. हे गाणे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गणेशोत्सवात नक्कीच वाजेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

‘गणेशोत्सव माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. गणरायासाठी गाणे गाण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणे श्रोत्यांच्या मनाला भिडेल आणि त्यांचा उत्सव आणखी आनंददायी करेल’, असा विश्वास गायक मंगेश बोरगावकर याने व्यक्त केला.