फॅसिस्ट प्रवृत्तीची माणसे देशाचे नेतृत्त्व करायला निघाली आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, या शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी नाव न घेता भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस सेवा दलाने मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी फॅसिस्ट विचारांच्या व्यक्तींवर टीका केली. 
ते म्हणाले, ज्यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली, ते विचार पुन्हा डोकं वर काढू लागले आहेत. जातीयवादी संघटना डोकं वर काढायला लागल्यात. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. फॅसिस्ट प्रवृत्तीची माणसे देशाचे नेतृत्त्व करायला निघाली आहेत.
महात्मा गांधींची हत्या ज्या विचारांनी केली, त्याच विचाराच्या लोकांनीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला.