गेल्या नऊ महिन्यांपासून स्वत:च्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला रबाले पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलांच्या मदतीने मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर नात्याला काळिमा फासणारा हा प्रकार समोर आला आहे.
४० वर्षीय रमाकांत शर्मा (बदललेले नाव) याला चार मुली आणि एक मुलगा आहे. पीडित मुलगी ही चार वर्षांची असल्यापासून गावाला मामाकडे राहायला होती. आईची तब्येत खालावल्याने ती जून २०१३ मध्ये या ठिकाणी राहण्यासाठी आली होती. ऑगस्ट २०१३ मध्ये औषधे घेऊन पत्नी झोपली असताना या नराधमाने प्रथम तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकाराने तिच्यावर प्रचंड मानसिक आघात झाला़  यानंतर सातत्याने तो तिच्यावर अत्याचार करत होता. आईची प्रकृती ठीक नसल्याने तिने हा प्रकार आईला सांगितला नव्हता. औषधामुळे गुंगीने बराच काळ पत्नी झोपेत असताना, रमाकांत तिच्यावर अत्याचार करीत होता.
१५ दिवसापूर्वी रमाकांत तिच्यावर अत्याचार करीत असताना, तिने केलेल्या आरडाओरडय़ानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या झोपडीचे दार ठोठावल्याने त्याने तिला सोडून दिले होते. यावेळी शेजाऱ्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, समोर वडील असल्याने भीतीने तिने काही सांगितले नव्हते. मात्र शेजाऱ्यांना रमाकांत याचा संशय आल्याने काही महिलांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली असता, तिने आज हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्यासह शेजाऱ्यांनी रबाले पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. या प्रकरणी रमाकांत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.