मुंबई : बालरुग्णांसाठी असलेल्या सर्व कफ सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते आणि त्यांच्या संघटना दिले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमध्ये भेसळीमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत.

आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे निर्देश्व सूचना

बालरुग्णांसाठी असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये.

औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत अनुसूची एच, अनुसूची एच १ आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच केली जाईल, याची खात्री करावी.

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना या औषधांची विक्री होत असल्याने या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नियमांचे पालन किरकोळ औषध विक्रेत्यांनी करावे

या औषधांची विक्री कोणी करत असेल, तर स्थानिक औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवावे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. – दा. रा. गहाणे, औषध नियंत्रक, अन्न व औषध प्रशासन विभाग

सीबीआय चौकशीसाठी याचिका

नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आणि औषध सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली असून, या घटनांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय न्यायिक आयोग किंवा तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडनंतर पंजाबने कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर बंदी आणली आहे.