मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी १५ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत राज्यातील विविध ठिकाणांहून दुधाचे तब्बल १ हजार ६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये विविध नामांकीत कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या ६८० आणि सुट्या दुधाच्या ३८२ नमुन्यांचा समावेश आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे लहान-थोर मंडळी दूध पितात. मात्र सध्या राज्यामध्ये दुधात भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना जरब बसण्यासाठी व भेसळ रोखण्यासाठी, तसेच राज्यातील जनतेला उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम व आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात व्यापक स्वरुपात दूध सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकाच वेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची सूचना १०३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजल्यापासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांमधून दुधाचे एकूण १ हजार ६२ नमुने विश्लेषणासाठी घेतले. यामध्ये विविध नामांकीत कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या ६८० आणि सुट्या दुधाच्या ३८२ नमुन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा…Saif Ali khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला, प्रियांका चतुर्वेदी म्हणतात, “वांद्रे येथील सेलिब्रिटी आणि….”

ताब्यात घेण्यात आलेले दुधाचे नमुने भेसळ, रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या विश्लेषणानंतर दुधात भेसळ असल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित उत्पादक व पुरवठादाराविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.दुधातील भेसळ ही गंभीर समस्या असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मुख्यमंत्री, विभागाचे मंत्री व राज्यमंत्री यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेत, भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यभरात दुधाचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली. तसेच अशा प्रकारची मोहीम वारंवार राबविण्यात येईल.राजेश नार्वेकर, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

हेही वाचा…मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेसळ रोखण्यासाठी सहकार्य करा

नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थामध्ये भेसळ असल्याचे आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदत क्रमांक १८००२२२३६५ वर त्वरित संपर्क साधावा किंवा ई-मेल jc-foodhq@gov.in वर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन राजेश नार्वेकर यांनी केले आहे.