मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राज्यभरात १५७ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून १३५ दुकांनांवर कारवाई करण्यात आली आहे.खोकल्याच्या औषधामध्ये विषारी घटक असल्याच्या धर्तीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात राबविलेल्या मोहिमेमध्ये २५७ औषध दुकानांची तपासणी केली. यामध्ये दोषी आढळलेल्या दुकानांपैकी १३५ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

तर १५७ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बाल मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बाल रुग्णांसाठी असलेल्या सर्व खोकल्याच्या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये, तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत अनुसूची एच, अनुसूची एच १ आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीद्वारेच केली जाईल याची खात्री करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते आणि त्यांच्या संघटनांना दिले होते.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केले. त्यानंतरही मुंबई, ठाणे व कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाची विक्री होत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील औषध विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे.