मुंबई : गोरेगाव स्थानकात एका महिला तिकिट तपासनीसावर महिला प्रवाशाने हल्ला केला. बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपी महिला प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंधेरी (पूर्व) परिसरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार गीता पांडोरिया (५२) तिकीट तपासनीस आहेत. त्यांनी तिकीट तपासणीच्या कामासाठी त्यांनी बुधवार २० ऑगस्ट रोजी अंधेरीहून बोरिवलीला जाणारी धीमी लोकल पकडली.
अंधेरी स्थानकातून लोकल निघाल्यानंतर त्यांनी डब्यातील प्रवाशांचे तिकिट तपासण्यास सुरुवात केली. गीता पांडोरिया यांनी दुपारी ३.३० च्या सुमारास प्रवासी सोनी चौहान (२६) यांना तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र चौहानकडे तिकीट नव्हते. तिने दंड भरायलाही नकार दिला आणि हुज्जत घालायला सुरवात केली. त्यामुळे पांडोरिया यांनी तिला गोरेगाव स्थानकात उतरवून तिकीट तपासनीसांच्या कार्यालयात नेले.
गोरेगाव स्थानकातील तिकिट तपासनीसांच्या कार्यालयात पोहोचल्यावरही सोनी वाद घालत शिवीगाळ करीत होती. यावेळी तिने गीता पंडेरिया यांना धमकीही दिली. उभयतांमध्ये वाद सुरू असताना अचानक तिने पांडोरिया यांच्यावर हल्ला केला. यात पांडोरिया यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली. सोनी चौहानने गोंधळ घालून सरकारी कार्यालयात अडथळा आणला. यावेळी अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून चौहावर नियंत्रण मिळवले.
या प्रकरणी तिकीट तपासनीस गीता पंडारिया यांच्या तक्रारीवरून बोरिवली रेल्वे पोलिसांनी चौहानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२ (शासकीय सेवकाला कर्तव्यापासून अडथळा आणणे), ११५ (२) (जखम करणे), ३५२ (जाणीवपूर्वक अपमान करून भांडण करणे) आणि ३५१ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौहानला नोटीस बजावली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.