मुंबई : शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचे निकवर्तीय सईद खान यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली.

‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ नावाच्या संस्थेतील निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप खान यांच्यावर असून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. त्यात त्यांनी आपण निर्दोष असून कधीही संस्थेचे पदाधिकारी नसल्याचा तसेच संस्थेचे कंपनीत रुपांतरित झाल्यानंतरच आपण अध्यक्ष झाल्याचा दावा केला होता.

हेही वाचा – आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल

तथापि, खान यांनी पडद्यामागून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. डागा यांनी त्यांची दोषमुक्ती मागणी फेटाळताना प्रामुख्याने नमूद केले. आरोपी हा संस्थेचा पदाधिकारी किंवा प्रभारी नव्हता, मात्र याचा अर्थ असा नाही की पदाधिकारी नसलेली व्यक्ती संस्थेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याप्रकरणी पडद्यामागील व्यक्तीला समोर आणणे आवश्यक आहे. या प्रकरणात, अर्जदार पडद्यामागून काम करत असल्याचे पुराव्यांतून दिसते, असे सकृतदर्शनी मतही न्यायालयाने नोंदवले.

हेही वाचा – दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम, अन्न आणि औषध प्रशासनाने दुधाचे १०६२ नमुने घेतले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सप्टेंबर २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खान यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. याच प्रकरणी विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या गवळी यांनी बाजू नोंदवण्यासाठी ईडीसमोर अनेक वेळा उपस्थिती लावली होती. खान आणि गवळी यांनी सुमारे १८ कोटी रुपयांची बनावट कागदपत्रे आणि फसवणूक करून संस्थेचे खासगी कंपनीत रुपांतर केल्याचा ईडीचा आरोप आहे.