मुख्यमंत्र्यांचे मुंबई महापालिकेस आदेश; मोकळ्या जागांवर बाजारांचे स्थलांतर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील करोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचला. भरारी पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सशंयित करोना बाधितांचा शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनास  दिले.

राज्यांतील इतर जिल्ह्यंच्या तुलनेत मुंबईतील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतआहे. त्यातच मुंबईमधील लोकसंख्या, दाट लोकवस्तीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला रोखणे कठीण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी  महापालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.यावेळी आयुक्त प्रवीण परदेशी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

परदेशी यांनी करोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच पुढील नियोजनाच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे. वरळी कोळीवाडय़ात करोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला असून तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दूषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला  हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील असे सांगत संशयित करोना बाधितांचा शोध घेण्यासाठी सर्वच  प्रभागात तातडीने भरारी पथके सक्रीय करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या पथकांकडे एक वाहन तसेच पालिका अधिकारी— कर्मचारी, पोलीस तसेच महसूल विभागाचा कर्मचारी व वैद्यकीय सहायक असेल. हे पथक कोरोनाविषयक रुग्ण , त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतील तसेच ताप. सर्दी, न्युमोनिया सदृश्य आजार असलेले लोक देखील शोधतील व त्यांच्या तपासणीसाठी तातडीने पुढील कार्यवाही करतील. १२ते २३ मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींचे संपर्कात आलेल्या व्यक्ती अधिक बारकाईने तपासा आणि त्यांना क्वारंटाईन कसे करता येईल ते पहा. अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्या कोणत्याही परिस्थितीत शोधा.यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

आपापल्या प्रभागामधील  खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरु करण्याची विनंती करा, त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अजूनही काही बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी दिसते. तेथील भाजीबाजारांमध्ये शिस्त आणा, त्यांना गल्लय़ा किंवा तारखा वाटून द्या. प्रसंगी बाजार मोकळ्या जागांवर स्थलांतरित करा अशा सुचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

सोसायटय़ांनी फवारणी करू नका!

सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायटय़ा व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची  तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वत: फवारणी करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find suspects from door to door to stop the spread cm abn
First published on: 01-04-2020 at 00:59 IST