मुंबई : अवजड वाहनांसाठी क्लिनरची सक्ती रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अवजड वाहनांवर क्लिनर नसल्याने बसणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या दंडापासून मुक्ती मिळाली आहे. या निर्णयामुळे मालवाहतूकदार संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील ट्रक चालक आणि व्यावसायिक वाहन चालक विनाक्लीनर प्रवास करत असल्यास रोज १,५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. तसेच हे चालन वारंवार भरावे लागत होते. ही कारवाई अन्यायकारक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक होती. त्यामुळे हजारो ट्रान्सपोर्टर्सना आर्थिक फटका बसत होता व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेकदा अवजड मालवाहतूकदारांनी क्लिनर सक्ती रद्द करण्याची मागणी केली जात होती.
परंतु, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे राज्यातील अवजड आणि प्रवासी वाहतूकदारांच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी १६ जून २०२५ रोजी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. तर, १ जुलै २०२५ रोजीपासून अनिश्चित काळापर्यंत संप पुकारला होता. त्यानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील सर्व प्रमुख वाहतूक संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन परिवहन विभागाने दिले होते.
विजयोत्सव साजरा करणार
क्लिनर रद्द करण्याचा निर्णय केवळ प्रशासकीय निर्णय नसून हा त्या प्रत्येक ट्रक चालक, ट्रान्सपोर्टर आणि या सेवेशी निगडीत असलेल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. क्लिनर रद्द करण्याची मागणी अनेक कालावधीपासून सुरू होती. या मागणीला यश आले असून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल. तसेच चालकांचा अनावश्यक त्रास आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळणार आहे. हा निर्णय परिवहन क्षेत्रासाठी सकारात्मक बदल घडवणारा टप्पा आहे.- बल मलकीत सिंह, माजी अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस</strong>
११ सप्टेंबर रोजी आंदोलन करणार
या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. परंतु राज्य सरकारकडून सुचवलेली जी यंत्रणा आहे, त्याची किमत काय ? अतिशय खर्चिक असेल तर, राज्य सरकारला याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येईल. आमची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ई-चलनबाबत असून यापूर्वी चुकीच्या पद्धतीने आकारण्यात येणारे सर्व चलन माफ करण्याबाबत राज्य सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील वाहतूकदार संपाच्या तयारीत आहेत. एक मागणी पूर्ण झाली असली तरी, ११ सप्टेंबर रोजीपासून उर्वरित मागण्यासाठी चक्काजाम करण्यात येईल. – डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघ