मुंबई : पतीचे कथित प्रेमसंबंध असलेल्या महिलेला तंत्रमंत्राने ठार मारण्यासाठी अथवा तिला अर्धांगवायूचा झटका आणण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करणाऱ्या भोंदूबाबविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने भोंदूबाबाला यापूर्वीही ४ ते ५ लाख रुपये दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी जादुटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा >>> वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम संथगतीनेच, आतापर्यंत केवळ नऊ टक्केच काम पूर्ण

वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राहणाऱ्या तक्रारदारांचा परदेशातून लाकडी साहित्याच्या आयातीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराच्या पत्नीला त्यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या महिलेपासून पतीला दूर ठेवण्यासाठी पत्नी भोंदूबाबाकडे जात होती. त्यांनी या भोंदूबाबाला ४ ते ५ लाख रुपये दिले होते. त्यामुळे व्यावसायिकाने याबाबत अधिक माहिती काढण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी सोमवारी बाहेर गेली होती. परिचयाच्या एका रिक्षाचालकाकडून ती भोंदूबाबाला भेटल्याचे तक्रारदारांना समजले.

हेही वाचा >>> कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे येथील एका अल्पोपहार केंद्राबाहेर पत्नी व भोंदूबाबा बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी तक्रारदारांनी विचारणा केली असता त्यांच्या जीवनातील कथीत महिलेला दूर करण्यासाठी आपण तेथे आल्याचे पत्नीने सांगितले. संबंधित महिलेला मारण्यासाठी अथवा तिला अर्धांगवायूचा झटका आणण्यासाठी भोंदूबाबाने दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी १३ दिवस होम-हवन करावे लागतील. या सर्व विधीसाठी १० हजार रुपये आगाऊ मागितल्याचे तक्रारदारांना समजले. त्यावेळी तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना तक्रारदाराने हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ भोंदूबाबाला ताब्यात घेतले आणि खेरवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी जादुटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी भोंदूबाब दिल्लीतील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले.