मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी गजबजलेल्या चर्चगेट स्थानकातील केकच्या दुकानाला गुरुवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही कालावधीतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. परंतु, या घटनेमुळे चर्चगेट परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले होते. तसेच काही काळ लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या कॉन्कोर्स परिसरातील केकच्या दुकानाला आग लागली होती. सायंकाली परतीचा प्रवास करण्यासाठी शेकडो प्रवासी चर्चगेट स्थानकात दाखल होत होते. परंतु, आगीच्या घटनेमुळे प्रवाशांची धावपळ सुरू झाली. आगीचा भडका उडाल्याने प्रवाशांनी स्थानकाबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
काही मिनिटातच आग पूर्णपणे विझवण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. बहुमजली रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील एका खाद्यपदार्थाच्या दुकानातील विद्युत तारा, वातानुकूलित यंत्रणेत आग लागली होती, असे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवून सर्व परिस्थिती हाताळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. चर्चगेट स्थानकात लोकल सेवेला कोणताही व्यत्यय आला नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्थानकातील इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटनेचे नेमके कारण चौकशीनंतर कळेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली. आग विझवल्यानंतरही परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पहिल्या मजल्यावरील काही कार्यालयेही रिकामी करण्यात आली होती.