मुंबई – दक्षिण मुंबईतील ग्रॅण्टरोड येथील पेडर रोड परिसरातील सहा मजली सुखशांती इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली. या इमारतीत असलेल्या ‘लिबास’ या कपड्यांच्या दुकानाला आग लागली होती. आगीत कोणी जखमी झाले नाही. वरच्या मजल्यांवरून अग्निशमन दलाने ८ जणांसह, श्वान आणि मांजरीची सुखरूप सुटका केली आहे.
वांद्रे येथील मॉलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी ग्रॅण्टरोड येथील पेडररोड या उच्चभ्रू परिसरात एका सहा मजली इमारतीत सकाळी पावणे आठ वाजता आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. अग्निशमन दलाने पहिल्या मजल्यावरून चार पुरुष आणि चौथ्या मजल्यावरून चार महिला, तीन कुत्रे व दोन मांजरींना सुरक्षितपणे बाहेर काढले.
ही आग शोरूममधील विद्युत यंत्रणा, विद्युत उपकरणे आणि कपड्यांना लागली होती. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धूर पसरला होता. या आगीत शोरूम मधील महागडे कपडे मोठ्या प्रमाणावर जळाले आहेत. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी बेस्ट विद्युत विभाग, पोलिस, १०८ रुग्णवाहिका सेवा यांच्यासह अग्निशमन दलाचे विविध अधिकारी आणि गाड्या दाखल झाल्या. सकाळी सव्वाआठ वाजता आगीवर चारही बाजूंनी नियंत्रण मिळवण्यात यश आले, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.