मुंबई : गोरेगाव येथील विवेक महाविद्यालयानजीकच्या सिद्धार्थ नगरमधील अतुल सोसायटीतील एका सदनिकेत बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. या घटनेदरम्यान इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे दोन रहिवासी गुदमरल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक २०३ मध्ये आग लागली. पहाटे सर्वजण साखरझोपेत असल्यामुळे आग लागल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले नाही. आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते. आग लागल्याचे समजताच रहिवासी जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. आगीमुळे इमारतीत प्रचंड प्रमाणात धूर झाला होता. त्या धुरामुळे रामीला साहा (६५) आणि कृणाल साहा (४०) यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेले. सद्यस्थितीत दोघांचीही प्रकृती स्थिर असून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पहाटे ४.३० च्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीत घरातील विद्युत यंत्रणा, विजेच्या तारा, वातानुकूलित यंत्रणा, लाकडी सामान, गाद्या, पलंग, पुस्तके व अन्य घरगुती सामान जाळून खाक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.