मुंबई : अंधेरी येथील चांदिवली फार्म मार्गावरील कमानी ऑईल गेटमागच्या होंडा शोरुमला शनिवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शोरुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, दुर्घटनास्थळी जवळपास पाच तास अग्नितांडव सुरू होते.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने मध्यरात्री १.४८ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्र. १) असल्याचे घोषित केले.
शनिवारी रात्री शोरुममधून काम आटोपून कर्मचारी आपापल्या घरी परतले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करून सकाळी ६.१२ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सद्यस्थितीत घटनास्थळी अग्निशमन दलाचे ‘कुलिंग ऑपरेशन सुरू असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
