लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपरमधील पंतनगर परिसरातील एका ११ मजली इमारतीला गुरुवारी दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह दोघे होरपळले. आगीत होरपळलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. तर एका तरुणावर उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले.

घाटकोपर पूर्व येथील पंतनगर, सह्याद्री नगर परिसरातील गणेश मंदिराजवळील ११ मजली इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेत गुरुवारी दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत दुपारी १.५३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.

आणखी वाचा-मुंबई : घरांच्या किमती कमी होणार? चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात सवलत मिळण्याची शक्यता

या दुर्घटनेत सचिन शेलार (३७) आणि निर्मला शेलार (३६) हे दोघे होरपळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोघांना राजावाडी रुग्णालयात नेले. सचिन शेलार यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. निर्मला शेलार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक ४०३ मध्ये आग लागली होती. आगीमध्ये घरातील सामानाचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.