साक्षीदाराने न्यायालयात आपल्या विरोधात साक्ष देऊ नये यासाठी त्याच्यावर फिल्मी पद्धतीने गोळीबार करण्याची घटना नुकतीच घडली होती. तब्बल महिनाभर हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत देवदर्शन करत फिरत होते. अखेर गुन्हे शाखा-८ च्या पथकाने शिताफीने सापळा लावून मुख्य आरोपीला अटक केली.
आरोपी गंगासागर ऊर्फ मजनू यादव (२८) याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात नुकताच तो जामिनावर सुटला होता. या खटल्याची तारीख जवळ येत होती. मुजाहीत खान हा त्याचा मित्र या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. त्याने न्यायालयात साक्ष दिली असती तर यादवचा गुन्हा सिद्ध झाला असता. त्यामुळे १ जुलै रोजी मजनू यादव आणि त्याचा साथीदार शाहिद कुरेशी या दोघांनी साकीनाकाच्या खैराणी रोड येथे मुजाहिद खान याच्यावर गोळीबार केला. भर बाजारात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. मुजाहिद खान या गोळीबारातून बचावला होता.