मुंबई : चेंबूर येथे झिकाचा रुग्ण आढळला आहे. उपचारानंतर या रुग्णाची प्रकृती ठीक असून, त्याला घरी सोडण्यात आले. मुंबईतील झिकाचा हा पहिलाच रुग्ण आहे. चेंबूर परिसरामधील एका ७९ वर्षीय वृद्धाला १९ जुलै रोजी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यांना २ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
महापालिकेने या रुग्णाची माहिती घेतली असता, त्याच्या घरातील काही व्यक्ती परदेशातून आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घरातील सर्वासह परिसरातील नागरिकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात या वृद्धाला झिकाची लागण झाली होती, असे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये झिकाचा संसर्ग आढळून आलेला नाही, असे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये झिकाचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये जुलै २०२१ मध्ये आढळला होता. एका ५० वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली होती.
लक्षणे काय?
एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा झिका हा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी, अस्वस्थता जाणवणे, ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.
झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे), मुंबई महानगरपालिका
