मुंबई : बर्फाच्या दरात वाढ करण्यात येणार असून त्याचा परिणाम मासळीच्या दरावर होणार आहे. मासळी साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर करण्यात येत असून मासळी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे ५ टक्के हिस्सा बर्फाच्या खरेदीसाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे बर्फाच्या दरात वाढ झाल्याने मासळीचे दरही वाढतील, असे मत मत्स्यव्यवसायिकांनी व्यक्त केले आहे. यामुळे ग्राहकांना मासळी खरेदी करण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मच्छीमार संघटना आणि बर्फ विक्रेत्यांच्या बैठकीत बर्फाच्या किंमतीत प्रतिटन ६५ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मच्छीमार संघटना आणि बर्फ विक्रेत्यांमध्ये याबाबत एकमत होत नव्हते. दरम्यान, बैठकीत झालेल्या ठरावानुसार ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होईल. ससून डॉक, भाऊचा धक्का याचबरोबर करंजा बंदर येथे मोठ्या प्रमाणात मासळीची खरेदी विक्री होते.
मासळी पकडण्यासाठी जाणाऱ्या बोटी आठ दिवस समुद्रात असतात. आठ दिवस पुरेल इतका बर्फसाठा त्यांना बोटीत करावा लागतो. त्यामुळे बर्फाचे वाढीव दर मच्छिमारांना परवडणारे नाहीत, असे मत मासळी विक्रेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, वीज दरवाढीमुळे बर्फ उत्पादकांना तोटा सहन कारावा लागत असल्याने मच्छीमार आणि बर्फ विक्रेत्यांमध्ये एकमत झाले. यामुळे १ ऑक्टोबरपासून मासळी खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
सध्या मासळीचे दर किती
सध्या बाजारात प्रती सुरमईचा दर ६०० ते १००० रुपये आहे. सध्या अर्धा किलो बोंबील ३०० रुपये, अर्धा किलो बांगडा ३५० ते ४०० रुपये, आकारमानानुसार पापलेटची जोडी ७०० ते १५०० रुपये आणि अर्धा किलो कोळंबी २५० ते ५०० रुपये दराला उपलब्ध आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून यामध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
बर्फाच्या किंमतीत झालेली वाढ, याचबरोबर मासळीला मिळणारा बाजारभाव यावर मासळीची किंमत अवलंबून आहे. – देवेंद्र तांडेल, मच्छिमार संघटना प्रमुख