मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने बेलासिस पुलालगतच्या गाळ्यांतील पात्र मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन भुलेश्वरमधील मिर्झा गालिब मंडईत करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मासळी विक्रेत्यांना पालिकेकडून पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, पालिकेच्या डी विभागात मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या महिलांचे सी विभागात पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाच्या जागेवरून मासळी विक्रेत्या महिला संतप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात येत्या १७ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा निर्णय कोळी बांधवांनी घेतला आहे.

बेलासिस पुलाच्या बांधकामात लगतच्या गाळ्यांतील मासळी विक्रीचा व्यवसाय अडथळा ठरत होता. त्यामुळे या महिलांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, या ठिकाणी पूर्वी व्यवसाय करणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांच्या वारसांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी कोळी बांधव आणि अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली होती. त्यामुळे पालिकेने सर्व मासळी विक्रेत्यांना आवश्यक कागदपत्रे आणि अनुज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत ९ डिसेंबर रोजी पालिका कार्यालयात मासळी विक्रेत्या महिला आणि पालिका प्रशासन यांची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर एकूण २७ महिलांनी पुनर्वसनाबाबत कागदपत्रे सादर केली. मात्र, त्यापैकी केवळ सात महिलांनी महापालिकेकडे आवश्यक कागदपत्रे आणि अनुज्ञापत्र सादर केले. त्यांनतर केवळ सात महिलांचे पुनर्वसन करण्याचा पालिकेने निर्णय घेतला. दरम्यान, ताडदेव येथील तुळशीवाडी मार्गावर महापालिकेने बांधलेल्या इमारतीत मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली होती. मात्र, पालिकेने या महिलांचे पुनर्वसन भुलेश्वर येथील मिर्झा गालिब मंडईत केल्याने मासळी विक्रेत्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अनेक वर्षांपासून ताडदेव येथे मासळी विक्रीचा व्यवसाय केल्यामुळे त्या भागातील अनेक ग्राहक जोडले गेले आहेत. तसेच, मिर्झा गालिब मंडईतील महिलांचेही ठरलेले ग्राहक आहेत. ते अन्य मासळी विक्रेत्या महिलांऐवजी ठरलेल्या विक्रेत्यांकडूनच मासळी विकत घेण्याला प्राधान्य देतात. ताडदेवमधील महिलांचे तिथे पुनर्वसन केल्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुनर्वसित महिलांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल, अशी भीती मासळी विक्रेत्या महिलांना सतावत आहे. महापालिकेने योग्य विचार न करता पुनर्वसनाचा निर्णय घेतल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली असून पालिकेच्या या निर्णयाविरोधात १७ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १३० वर्षांपासून मासे विक्रीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या मासे विक्रेत्या महिलांचा व्यवसाय संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महानगरपालिकेतील असंवेदनशील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही स्थिती निर्माण झाल्याची खंत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली.