मुंबई : देशाच्या सागरी मत्स्योत्पादनात दोन टक्क्यांची किरकोळ घट झाली असताना, महाराष्ट्राच्या सागरी मत्योत्पादनात गतवर्षाच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी भरीव वाढ झाली आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) २०२४ च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
राज्यात अवैध मासेमारीवर कठोर कारवाई केली जात आहे. किनाऱ्यावर महत्त्वाच्या ठिकाणी अवैध मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे परराज्यातून राज्यात येऊन अवैध मासेमारी करणाऱ्यांवर आणि बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर वचक बसला आहे.
२०२४ मध्ये देशाचे मत्स्योत्पादन केवळ ३४ लाख ७० हजार टन होते, तर २०२३ मध्ये ते ३५ लाख ३० हजार टन होते. देशाच्या एकूण मत्स्योत्पादनात यंदा २ टक्क्यांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत, महाराष्ट्राने यश मिळविले आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक ४७ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालने ३५ टक्के, तमिळनाडूने २० टक्के तर ओडिशाने १८ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये बांगडा माशाचे उत्पादन वाढले आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात सर्वाधिक आलेल्या माशांमध्ये बांगड्याचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे. बांगडा २.९३ लाख टन तर तारळीचे उत्पादन २.४१ लाख इतके झाले आहे. या व्यतिरिक्त, पेडवे वर्गीय, मांदेली या सारख्या माशांचेही उत्पादन वाढले आहे.
आता गोड्या पाण्यातील मासेमारीवर लक्ष केंद्रित करणार
राज्याच्या सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली आहे. आता गोड्या पाण्यातील मासेमारीवर लक्ष्यकेंद्रीत केले आहे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावर आहे, वर्षाअखेरीस किमान पहिल्या १० मध्ये समावेश व्हावा, असे नियोजन आहे. तलावांमधील मासेमारीत वृद्धी होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, नव्याने निविदा प्रक्रिया आणि दर्जेदार मत्स्य बीज पुरवठा केला जात आहे, असे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.