मुंबई : जोगेश्वरी पोलिसांनी बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागिरकांना ताब्यात घेतले असून त्यांना भारतातून हद्दपार करून बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षाला (एटीसी) एक बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सलीम बोल्ला (३८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अन्य चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ते बांग्लादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना हद्दपार करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला आहे.

बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी समस्या

बांग्लादेशी नागरिकांच्या घुसखोरीची समस्या भारतासाठी गंभीर आणि दीर्घकालीन आव्हान ठरली आहे. ही घुसखोरी मुख्यतः भारताच्या ईशान्य राज्यातून आणि पश्चिम बंगालमधून होत असून त्यांची संख्या महाराष्ट्रात विशेषत मुंबईत हळूहळू वाढत आहे. भारत-बांग्लादेश सीमेला सुमारे ४,००० किलोमीटर लांबी आहे. अनेक ठिकाणी तटबंदी नसल्यामुळे बांगलादेशी नागरिक सहज भारतात प्रवेश करतात. सीमेजवळील तस्कर आणि दलालांचे जाळे घुसखोरीला चालना देत आहेत. बांगलादेशमधील काही भागांतील लोकसंख्येत झालेली वाढ, बेरोजगारी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतर करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अनेक बांग्लादेशी नागरिक भारतात स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात.

मुंबईसह विविध शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषज्ञांच्या मते, बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी जटिल आणि दीर्घकालीन समस्या आहे. यावर प्रभावी उपाययोजना न केल्यास भविष्यात सामाजिक तणाव, संसाधनांची कमतरता आणि सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे.