मुंबई : मुंबई महानगरपालिकेने महिलांसाठी बसगाडीमध्ये स्वच्छतागृह तयार करून ‘ती शौचालय’ नावाने शहर भागात काही ठिकाणी उपलब्ध केली. मात्र या स्वच्छतागृहांकडे आता मुंबई महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. फॅशनस्ट्रीट येथील या गुलाबी रंगाच्या ‘ती शौचालयात’ चक्क खाद्यपदार्थ बनवून विकले जात आहेत. गाडीच्या बाहेर स्टूल टाकून खवय्ये या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत.
बेस्टच्या बसगाडीमध्ये स्वच्छतागृह तयार करण्याचा उपक्रम मुंबई महापालिकेने ‘ती शौचालय’ नावाने २०२२ मध्ये सुरू केला होता. यापैकी पहिली बस सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर उभी करण्यात आली होती. गुलाबी रंगाच्या या बसमध्ये शौचालय, प्रसाधनगृह याबरोबरच अन्य सुविधाही देण्यात आल्या होत्या. या बसला मिळालेल्या प्रतिसादानंतर मुंबई महापालिकेने आणखी चार विभागात बसमधील शौचालये सुरू केली. पिंक टॉयलेट या नावाने ही स्वच्छतागृहे सुरू झाली. त्यापैकी एक स्वच्छतागृह फॅशन स्ट्रीट परिसरात आहे.
मुंबईत दररोज लाखो नागरिक कामानिमित्त मुंबईत येत असतात. वाढत्या लोकसंख्येला पुरेशी शौचालये मुंबईत नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होते. तर महिलांसाठीही पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे महिलांचीही कुचंबणा होते. शौचालये असली तरी ती स्वच्छ नसल्यामुळे अनेकदा महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये जाणे टाळतात. फिरतीच्या स्वरुपाचे काम करणाऱ्या महिलांना प्रसाधनगृह शोधावे लागते. मधुमेहाचा त्रास असलेल्या किंवा गर्भवती महिलांनाही स्वच्छतागृह वेळेवर सापडत नाही. शौचालय उभारण्यासाठी मुंबईत पालिकेला जागा शोधावी लागते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी पालिकेने बेस्टच्या भंगारातील गाड्यांमध्ये स्वच्छतागृह तयार करण्याचे ठरवले होते.
बेस्टच्या गाड्यामध्ये फिरती स्वच्छतागृहे तयार करावीत. महामार्ग, हमरस्ते, लहान-मोठ्या गर्दीच्या रस्त्यावर पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही जुन्या बसगाड्यांमध्ये स्वच्छतागृह तयार करावे, अशी मागणी नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यानंतर अशी बस उभी करण्याचे पालिकेचे ठरवले होते व त्याकरीता जागेचाही शोध सुरू होता. प्रत्यक्षात २०२३ मध्ये ती शौचालय सुरू झाले. महिलांसाठी असलेल्या या स्वच्छतागृहामध्ये शौचालयाबरोबरच, सॅनिटरी नॅपकीनची सुविधा, स्तनपानासाठी, कपडे बदलण्यासाठीची सुविधा, खाद्यपदार्थ विकत मिळण्याची सुविधा या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात येतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते.
दरम्यान, या स्वच्छतागृहांसाठी जागा, पाणी आणि वीज पालिकेतर्फे पुरवली आहे. या स्वच्छतागृहाच्या मागील भागात महिलांसाठी उपयुक्त वस्तू विकण्यासही परवानगी आहे. हे स्वच्छतागृह चालवण्यासाठी महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. अत्यंत नाममात्र शुल्कात हे स्वच्छतागृह महिलांना वापरता येणार आहे, असे या योजनेच्या सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र आता कोणतेही नियम पाळले जात नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे. या शौचालयाच्या मागच्या भागात चक्क पदार्थ बनवून विकले जातात. या गाडीवर ऑमलेट पाव खाण्यासाठी लोक टेबल टाकून बसतात. ही खानपानाची सेवा देण्यासाठी पुरुष असतात. तसेच या बसची देखभालही सध्या पुरुषच करीत आहेत. त्यामुळे महिला या ठिकाणी जायला कचरतात. मुंबई महापालिकेने देखभालीचे कंत्राट रद्द करून नव्याने या शौचालयाच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमावे, अशी मागणी गुरव यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
या शौचालयांमध्ये केवळ पाकीटबंद खाद्यपदार्थ विकण्यास परवानगी आहे. मात्र त्याचा गैरवापर होत असेल तर त्याची तपासणी करून लवकरच कारवाई करू, अशी प्रतिक्रिया ए विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी दिली आहे.