मुंबई: अंधेरीमधील मोगरा नाल्यात प्रथमच मोठ्या संख्येने लेसर फ्लेमिंगोंनी हजेरी लावली असून फ्लेमिंगोंच्या हजेरीमुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. पहाटेच्या सुमारास मोगरा नाल्यात फ्लेमिंगोंचे दर्शन घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, लेसर फ्लेमिंगो सामान्यतः खाऱ्या पाण्याच्या तलावांमध्ये आणि पाणथळ जागांमध्ये आढळतात. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये गुजरातमधून फ्लेमिंगो स्थलांतर करून ठाणे, ऐरोली, शिवडी आणि माहुल येथे दाखल होतात.
विशेषतः ठाणे खाडी, एनआरआय तलाव, शिवडी, उरण आणि न्हावा-शेवा भागात मोठ्या संख्येने दिसतात. मात्र, अंधेरीसारख्या गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात लेसर फ्लेमिंगो दिसणे ही दुर्मिळ बाब आहे. ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनचे अय्यक्ष धवल शहा यांनी समाज माध्यमावर याबाबतची माहिती दिली.
मुंबईत प्रामुख्याने दोन प्रकारचे फ्लेमिंगो आढळतात. यापैकी ग्रेटर फ्लेमिंगो आकाराने मोठे असतात. यांचा रंग फिकट गुलाबी आणि पाय लांबट गुलाबी रंगाचे असतात. त्यांची चोच मोठी आणि टोकाकडे काळसर असते. हे फ्लेमिंगो मुंबईत पाहायला मिळतात. तर दुसरे लेसर फ्लेमिंगो आकाराने लहान असतात. त्यांचा रंग गडद गुलाबी असतो.
डोके आणि चोच थोडेसे झुकलेले असते, चोच पूर्णपणे गडद गुलाबी आणि काळसर असते.दरम्यान, या घटनेमुळे नाल्याभोवतीचा परिसर, कांदळवनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील ही जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. या परिसरात फ्लेमिंगो दिसण्यामागे पर्यावरणीय कारणेही असू शकतात.
फ्लेमिंगो येण्याची संभाव्य कारणे- मोगरा नाल्यात अल्गी (शैवाळ), जलचरांची उपस्थिती फ्लेमिंगोंना आकर्षित करते. हा त्यांच्या आहाराचा मुख्य भाग आहे.
– या भागात काही प्रमाणात कांदळवन आहे, जे फ्लेमिंगोंना नैसर्गिक आश्रय देतात. जर मानवी हस्तक्षेप कमी असेल तर पक्षी तिथे विसावतात.- ठाणे किंवा नेहमीच्या अधिवासांमध्ये बांधकाम, प्रदूषण किंवा मानवी हस्तक्षेप वाढल्यास फ्लेमिंगो दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात.
अधिवासात बदल शक्य
फ्लेमिंगो आपल्या अधिवासात बदल करू शकतो. विशेषत: अन्न आणि सुरक्षिततेच्या गरजांनुसार शहरी नाल्यांमध्ये, कमी मानवी व्यत्यय, पुरेसे अन्न आणि काही प्रमाणात शांतता असलेल्या ठिकाणी ते विसावू शकतात.
फ्लेमिंगोंची मुंबईतील प्रमुख ठिकाणे
– ठाणे खाडी- शिवडी
– माहुल- टी.एस.चाणक्य, नेरूळ
– पूर्व मुक्त मार्गाजवळील दलदलीचा भाग
मुंबईतील फ्लेमिंगोची संख्या
(बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) अहवालानुसार)
२०१८- सुमारे १.२० लाख फ्लेमिंगो
२०२० (टाळेबंदीदरम्यान)- १.५० लाखांहून अधिक
२०२४-२५- ठाणे खाडी आणि नेरूळ परिसरात फ्लेमिंगोंच्या संख्येत स्थिरता
पर्यावरणप्रेमी संघटनांचे योगदान
ओशिवरा सिटिझन्स असोसिएशन, सेव्ह कोस्टल वेटलॅण्ड्स मूव्हमेंट, बीएनएचएस आणि मॅंन्ग्रूव्ह फाउंडेशन या संस्था जैवविविधतेसाठी सातत्याने लढत आहेत. त्यांनी प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि पर्यावरण शिक्षण आदी कार्यक्रम राबविले आहेत.
पर्यावरणीय बदलांमुळे काही वेळा स्थलांतरित पक्षी त्यांच्या पारंपरिक मार्गांपासून वेगळ्या दिशेला जाऊ शकतात. विशेषत: हवामान बदल किंवा पाणथळ जागांमधील बदलांमुळे त्यांना नवीन ठिकाण निवडावे लागते. मोगरा नाल्याची निवड हे याचाच भाग असू शकते.
मृगांक प्रभू, पक्षीशास्त्रज्ञ,बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी