राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे. कारण, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे. तर, करोना महामारी सुरू झाल्यापासून मुंबईत पहिल्यांदाच दिवसभरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील २४ तासांत मुंबईमध्ये एकाही करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर, ३६७ नवीन करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. महागनराचा पॉझिटिव्हिटी रेट १.२७ टक्के झाला असून, यामध्ये ५ हजार ३० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७ टक्के आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये २८ हजार ६०० पेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात कोणताही अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन नाही. ५० इमारती या सील राहणार आहेत. करोना महामारीची दुसरी लाट शिखरावर असताना मुंबईत मोठ्यासंख्येने दररोज करोनाबाधित आढळत होते. एका दिवसात ११ हजार करोनाबाधितांसह मोठ्या संख्येने करोनाबाधितांचे मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला भयावह परिस्थिती निर्माण झालेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरूवातीला मुंबईत करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं रुग्णांची बेडसाठी प्रचंड हेळसांड झाली. मात्र, नंतर विविध उपाययोजना करत आणि बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या वाटपात सुसूत्रता आणत मुंबई महापालिकेनं परिस्थितीवर पकड मिळविण्याचे प्रयत्न केले.