मुंबई : कृत्रिम तंत्रज्ञान, शिक्षण, चीप, सेमिकंडक्टर, संरक्षण, दूरसंचार, मनोरंजन, डिजिटल आणि वित्तीय तंत्रज्ञान आदी अनेक क्षेत्रांत भारत-ब्रिटन या देशांमध्ये आगामी काळात व्यापारवृद्धी होऊन विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य होईल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी गुरुवारी येथे केले. ब्रिटनमधील ९ नामांकित विद्यापीठे भारतात आपली विद्यासंकुले सुरू करणार असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे, असे त्यांनी नमूद केले.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांच्यासमवेत आतापर्यंतचे सर्वांत मोठे १२५ सदस्यीय शिष्टमंडळ आहे. त्यात उद्योग, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रातील उद्योगपती व उच्चपदस्थांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी स्टार्मर यांनी चर्चा केल्यानंतर यासंदर्भात मिसरी यांनी ‘जिओ कन्व्हेंशन सेंटर’मध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेचा गोषवारा सांगितला.

भारत-ब्रिटन दरम्यान जुलै २०२५ मध्ये झालेल्या करारानुसार अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारात वाढ होईल आणि आयात खर्च कमी होईल. ब्रिटनमधील नामांकित ९ विद्यापीठे भारतात विद्यासंकुले उभारणार असून गुजरातमधील गिफ्ट, गुरगाव, बंगळूरु व मुंबईचाही त्यात समावेश आहे. मनोरंजन क्षेत्रातही मोठे सहकार्य अपेक्षित असून स्टार्मर यांनी यशराज फिल्म स्टुडिओला बुधवारी भेट दिली. दोन्ही देशांमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण करण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्यात येणार असून मनोरंजन क्षेत्रातील उभयपक्षी सहकार्यात वाढ होईल, असा विश्वास मिसरी यांनी व्यक्त केला.

बेकायदा स्थलांतरावर उपाययोजना

भारतातून ब्रिटनमध्ये अवैध मार्गाने किंवा बेकायदा पद्धतीने जाणाऱ्यांचे समर्थन केले जाणार नाही. मात्र इमिग्रेशन किंवा व्हिसा घेऊन ब्रिटनला जाण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, असे मिसरी यांनी सांगितले.

खलिस्तानी कट्टरतावादाला स्थान नाही

खलिस्तानी कट्टरतावादाचा मुद्दा मोदी आणि स्टार्मर यांच्यातील चर्चेत उपस्थित झाला होता. हिंसक कट्टरतावादाला सामाजिक स्वातंत्र्याचा गैरवापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मोदी यांनी स्टार्मर यांना सांगितल्याचे मिसरी यांनी नमूद केले. या कट्टरतावादाविरोधात दोन्ही देशांमध्ये असलेल्या कायदेशीर चौकटीच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे या चर्चेत स्पष्ट करण्यात आले. ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या कारवाया वाढत असल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे.