लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावाने धमकीचा ई-मेल आला. या प्रकरणी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होता. ते प्रकरण आता गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. धमकीचा ईमेल अमेरिका देशा जवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात धमकीचा दूरध्वनी आला होता.

झिशान सिद्धीकी यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ई-मेल येत असून त्यात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने १० कोटी रुपयांच्या खंडणीचा तसेच दाऊद टोळीच्या नावाचाही उल्लेख केला आहे. हा ईमेल अमेरिकेजवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. धमकीच्या ईमेलकडे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी सुरूवातीला दुर्लक्ष केले. पण पहिल्या ई-मेल नंतर सहा तासांनी पुन्हा दुसरा धमकीचा ई-मेल आला आहे.

या प्रकरणी झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर वांद्रे पोलिसांनी झिशान सिद्दीकी यांच्या घरी येऊन त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरूवात केली होती. त्यावेळी संबंधीत ईमेल पाठवण्यासाठी परदेशातील सर्व्हरचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. बाबा सिद्दीकी हत्या, तसेच झिशान सिद्दीकी यांना यापूर्वी आलेल्या धमक्यांचे प्रकरणांचा तपास गुन्हे शाखा करत असल्यामुळे हे प्रकरणही गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात तरी हा खोडसाळपणा असल्याचे वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झिशान व अभिनेता सलमान खान यांना धमकी देण्यात आली होती. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात याबाबत दूरध्वनी आला होता. निर्मल नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता धमकी देणाऱ्याने झिशान सिद्दीकी व सलमानला धमकी दिली, असे सूत्रांनी सांगितले. गुन्हे शाखाही याप्रकरणी तपासणी करत आहे. ईमेल कंपनीकडून माहिती घेण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेरच लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर, झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकी यांची हत्या झालेल्या कार्यालयाबाहेर धमकीचा दूरध्वनी आला. याबाबत पोलिस तपास करत आहेत. त्या प्रकरणाचा तपासही गुन्हे शाखाच करत आहे.