मुंबई : भाजपने शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याबरोबरच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही (अजित पवार) धक्का देत माजी आमदार व अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माण, खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) अनेक पदाधिकारी, नेत्यांनी तसेच मराठवाड्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी त्याचबरोबर गेवराईतील माजी आमदार बदामराव पंडित हे शिवसेनेला (उद्धव ठाकरे) रामराम ठोकत भाजपमध्ये नुकतेच दाखल झाले आहेत.
भाजप प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केनेकर, अनुराधा चव्हाण, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असल्याने शक्यतो एकमेकांच्या पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, असे सूत्र ठरले होते. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक ठिकाणी भाजपला सत्ता काबीज करायची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस या विरोधी पक्षांमधीलच नव्हे, तर महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांमधील माजी आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये सामील करुन घेण्यात येत आहे.
भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची आवश्यकता उरलेली नसून तो स्वबळावर उभा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन प्रदेश कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभात नुकतेच केले आहे. त्याचेच प्रत्यंतर दिसू लागले असून महायुतीतील पक्षांमधील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत.
मोहोळ तालुक्यातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मोहोळचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, दीपक माळी, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भारत सुतकर, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, उपसभापती प्रशांत बचुटे, जि. प. माजी सभापती जालिंदर भाऊ लांडे आदींचा समावेश आहे.
