मुंबई : कला शिक्षणातील पदविका अभ्यासक्रमासाठी म्हणजेच जीडी आर्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत आवश्यक असलेली फाउंडेशन किंवा मूलभूत अभ्यासक्रमाची अट सरकारने काढून टाकली आहे. त्याऐवजी फक्त दहावीच्या गुणांवर आता या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असल्याने गेले वर्षभर फाउंडेशन अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात हा अभ्यासक्रम करण्याचा उपयोग काय, आमच्यावर हा अन्याय का, असे प्रश्न हे विद्यार्थी विचारत आहेत. पण या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे सांगितले जात आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार जीडी आर्ट हा चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आता तीन वर्षांचा करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या आधी एक फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट होती. या अभ्यासक्रमानंतर जीडी आर्टच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊन हे विद्यार्थी पुढील तीन वर्षे डिप्लोमा करीत होते. पण ही चार वर्षे खर्ची घालण्यापेक्षा आता तीन वर्षांची पदविका करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर गेले वर्षभर राज्यातील विविध कला संस्थांमध्ये फाउंडेशन अभ्यासक्रम करत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आम्ही वर्षभर अभ्यास करून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे आम्हाला जीडी-आर्टच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळेल, पण या निर्णयाने आमच्या आशा माळवल्या आहेत. नव्या निर्णयामुळे आता कोणताही अभ्यासक्रम न केलेल्या आणि फक्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार असेल, तर मग या मूलभूत अभ्यासक्रमासाठी आमचा वेळ आणि पैसा वाया गेला, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. तसेच एनईपीचा दाखला देताना एनईपीमध्ये तीन वर्षीय अभ्यासक्रमानंतर पदविका नाही, तर पदवी दिली जाते, याचा विसर सरकारला कसा पडतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता अंगी कलागुण असलेल्या सर्वांनाच समान संधी मिळावी, यासाठी फाउंडेशन अभ्यासक्रमाची अट काढल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनाच फाउंडेशन अभ्यासक्रम करणे शक्य होत नाही. पण म्हणून ते कला शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा या निर्णयामागचा हेतू आहे. तसेच फाउंडेशन करूनही विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात, असेही या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.