मुंबई: मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दोन वर्षात मियावाकी वने उभारण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. दोन वर्षात चार लाख झाडे मियावाकी पद्धतीने मुंबईत ठिकाठिकाणी लावण्यात आली आहेत. मात्र मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत उद्यान विभागाला मुंबईत आणखी एक लाख झाडे मियावाकी पद्धतीने लावण्याचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे. त्यापैकी ५० हजार झाडे लावण्यात आली असून आणखी पन्नास हजार झाडे लावण्यासाठी १६ ठिकाणी मियावाकी वने विकसित करण्यात येणार आहेत.

मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेने मियावाकी पद्धतीने शहरी जंगल उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत चार लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. कमी जागेत अधिकाधिक झाडांची लागवड करण्यात येणाऱ्या जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याच्या या प्रकल्पाची सुरूवात २६ जानेवारी २०२० रोजी करण्यात आली होती. दोन वर्षात चार लाख झाडांची लागवड करण्यासाठी ६४ लहान-मोठ्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. एका चौरस मीटरमध्ये तीन झाडे याप्रमाणे वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत एक लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर मियावाकी वने विकसित करण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची सुटका, सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता

दरम्यान, मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत आणखी एक लाख झाडे मियावाकी पद्धतीने लावण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५० हजार झाडे लावण्यात आली असून मार्चपर्यंत आणखी ५० हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट्य प्रशासनाने ठेवले आहे. त्याकरीता आणखी १६ लहान-मोठे भूखंड निवडून ते शहरी जंगल म्हणून विकसित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मियावाकी वनांसाठी देशी झाडांची लागवड करण्यात येते. त्यामुळे हरित क्षेत्र वाढण्याबरोबरच देशी झाडांची संख्याही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या मियावाकी वनांपैकी १४ वने ही ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’तून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) किंवा स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने फुललेली आहेत. या वनांमध्ये ५० प्रजातींची झाडे लावण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असलेल्या झाडांचा त्यात समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याठिकाणी मियावाकी वने

सर्वाधिक म्हणजे तब्बल ३८ हजार ८२९ झाडांची लागवड महापालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभागातील ‘आयमॅक्स’ थिएटरजवळच्या भक्ती पार्क उद्यानातील भूखंडावर करण्यात आली आहे. तर या खालोखाल ‘एल’ विभागातील एका भूखंडावर २७ हजार ९०० झाडे आणि चेंबूर परिसरातील पूर्व मुक्त मार्गालगतच्या महापालिकेच्या अखत्यारितील एका भूखंडावर २१ हजार झाडे लावण्यात आली आहे. ‘पी उत्तर’ विभागातील मालाड पश्चिम परिसरात असणाऱ्या मनोरी गावालगतच्या एका भूखंडावर १८ हजार ७०० झाडे लावण्यात आली आहेत.