पालिकेच्या चार हजार आरोग्यसेविकांनी येत्या ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोग्य सेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. मुंबईतील घराघरांमध्ये फिरून बालकांचे लसीकरण करणे अ जीवनसत्त्व वाटप, जंतुनाशक कार्यक्रम, स्त्राी-पुरुष नसबंदी, संसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधणे, पल्स पोलिओसारखे कार्यक्रम राबविणे अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे काम आरोग्य सेविका करीत असतात.
हेही वाचा >>> एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्याना वर्षभरानंतरही नियुक्तीपत्र नाही; आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण
पालिकेच्या विविध सेवा घरोघरी पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या आरोग्य सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सेविकांच्या प्रश्नासंबंधी संयुक्त बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी आरोग्यसेविकांना चर्चेसाठी वेळ दिलेला नाही, असा आरोप आरोग्य सेविकांच्या संघटनेने केला आहे. आरोग्य सेविकांना वेळ न देता अभियंत्यांचे प्रश्न मात्र तातडीने सोडविण्यात आले, असाही आरोप संघटनेने केला आहे.
हेही वाचा >>> मुंबईः तोतया पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, आरोपी पसार
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आरोग्य सेविका आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. किमान वेतन रू अठरा हजार व भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, या मागण्यांवर न्यायालयाने आदेश देवून सुद्धा बृहन्मुंबई मनपा त्याची अंमलबजावणी करीत नाही. शेकडो आरोग्यसेविका वयोमानानुसार निवृत्त झाल्या आहेत. परंतु त्यांना एकही रुपया देण्यात आला नाही. त्या उपासमारी सोसत आहेत. या आंदोलन मध्ये नवीन भरती झालेल्या आशा सेविकाही सामील होवून त्यांची एकजूट दाखवणार आहेत, अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड प्रकाश देवदास यांनी दिली.