लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुर्ल्यातील एका तरुणाला काही भामट्यानी नऊ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी तरुणाने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

हैदर खान असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून तो कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात वास्तव्यास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हैदर शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला समाजमाध्यमांवर शेअर बाजारसंबंधित एक जाहिरात दिसली. त्यावरील क्रमांकावर त्याने फोन केला असता, त्याला अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले. यासाठी त्याला एका ॲपच्या माध्यमातून काही पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला त्याने कमी रक्कम जमा केली. त्याला ॲपवर तत्काळ नफा दिसू लागला. त्यामुळे त्याने या ॲपच्या माध्यमातून अधिक रक्कम गुंतवली. मात्र त्याला हे पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे त्याने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, विविध कारणे सांगून त्याला आणखी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. आशा प्रकारे या तरुणाने एकूण ९ लाख ३० हजार रुपये भरले. मात्र पैसे परत मिळत नसल्याने अखेर त्याने याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.