ठाणे, मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांना लाखोंचा गंडा

मुंबई : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी शिगा मधल्यामध्ये लांबवून पूर्व उपनगरांसह ठाण्यातील अनेक बांधकाम व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गुन्हे शाखेने गजाआड केली.

भांडुप येथील स्मशानभूमीजवळ पहाटेच्या सुमारास गेल्या आठ महिन्यांपासून दररोज निरनिराळ्या बांधकाम व्यावसायिकांनी मागवलेल्या शिगांमधील मोठा भाग ही टोळी चोरत होती. विशेष म्हणजे ही चोरी बांधकाम व्यावसायिकांच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून केली जात होती, असा दावा गुन्हे शाखेने केला.

गुन्हे शाखेच्या चेंबूर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी यांना भांडुप येथे इमारत बांधकाम कंपन्यांनी मागविलेल्या शिगांची मोठय़ा प्रमाणात चोरी केली जाते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, हवालदार उज्ज्वल सावंत आणि पथकाने धाड घालून शिगा चोरणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. या ठिकाणी चोरलेल्या सुमारे १७ टन शिगांच्या साठय़ासह गुन्ह्य़ात वापर झालेला ट्रेलर, टेम्पो अशी दोन वाहने जप्त करण्यात आली.

ठाण्यातील सिद्धी गौरव एंटरप्रायझेस कंपनीने वाडा येथून सुमारे २८ टन शिगा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मागवल्या होत्या. कंपनीतून तितक्या शिगा पाठवण्यात आल्या. टोळीने त्यातील सुमारे तीन टन शिगा काढून घेतल्या. या गुन्ह्य़ात सिद्धी गौरव एंटरप्रायझेसचा स्टोर किपर सहभागी होता, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली. उर्वरित १४ टन शिगा अशाच पद्धतीने अन्य बांधकाम व्यावसायिकांकडून चोरलेल्या आहेत.

वाडा किंवा अन्य उत्पादक कंपन्या शिगांचे वजन केले जाते. तसेच चलान चालकासोबत दिले जाते. चालक कंपनीतून मिळालेल्या पत्त्यावर म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी या शिगा वाहून आणतो. बांधकाम ठिकाणी स्टोअर किपर किंवा बांधकाम व्यावसायिकाचा अधिकारी खातरजमेसाठी जवळच्या वजनकाटय़ावर या शिगांचे पुन्हा वजन करून घेतो. कंपनीने चालकासोबत धाडलेले चलान आणि वजन काटय़ावरील पावती जुळल्यासच शिगा स्वीकारल्या जातात. या प्रकरणात सिद्धिगौरव एंटरप्रायझेसच्या स्टोर किपरने शिगांचे वजन मापून घेतले. खातरजमेची पावती हाती आल्यानंतर मात्र त्याने या टोळीसोबत तीन टन शिगा काढून घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पावती किंवा चलान यावरील नोंदीच खातरजमेसाठी पुरेशा असतात. पुन्हा पुन्हा मागवलेल्या मालाचे वजन केले जात नाही. त्यामुळे शिगा चोरणाऱ्या टोळ्या अलीकडे बांधकाम व्यावसायिकाच्या नेमक्या अधिकाऱ्यालाच फितवून गुन्हे करतात. या प्रकरणी अटक केलेल्या टोळीने पूर्व उपनगरांसह ठाण्यातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या अधिकाऱ्यांना फितवून गेल्या आठ ते दहा महिन्यांत लाखो रुपयांच्या शिगा चोरल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  चोरलेल्या शिगा ही टोळी बाजारभाव किंवा त्यापेक्षा कमी किमतीत विकते.  तसेच गुन्ह्य़ात साथ दिल्याबद्दल व्यावसायिकाचा अधिकारी आणि ट्रेलर चालकाला टनामागे २० हजार रुपये मोबदला देते.