मुंबई : दक्षिण मुंबईमधील नाना चौक परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ पालिका शाळेतील दवाखान्यामध्ये करोनाची विनामूल्य चाचणी करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईमधील पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच गिरगाव, खेतवाडी, ग्रॅन्ट रोड, मलबार हिल, ताडदेव, मुंबई सेंट्रल परिसरातील ३५८६ नागरिकांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी २६१६ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ८१६ सक्रिय रुग्ण आहेत. पालिकेचा ‘डी’ विभाग आणि आसपासच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असलेल्या रुग्णांना करोनाची चाचणी करण्यासाठी नायर रुग्णालयात अथवा खासगी प्रयोगशाळांमध्ये जावे लागत होते.  नायर रुग्णालयात सध्या करोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. नायर रुग्णालयात संसर्ग होण्याचा धोका असल्याने अनेक जण चाचणीसाठी तेथे जाणे टाळतात. त्यामुळे अनेकांना खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे भरून चाचणी करून घ्यावी लागली आहे. मात्र आता ‘डी’ विभाग कार्यालयाने ग्रॅन्ट रोड येथील नाना चौक परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ पालिका शाळेतील दवाखान्यात विनामूल्य चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. दवाखान्यात तपासणी झाल्यानंतर लक्षणे पाहून ही चाचणी करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free coronavirus test at bmc hospitals zws
First published on: 21-07-2020 at 01:33 IST