टाटा ट्रस्टचा खान अकादमीशी पाच वर्षांचा करार
गुणवंतांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शाळा तसेच शैक्षणिक संस्थांना आर्थिक व अन्य मदत करीत सामाजिक बांधिलकीचे भान जपणाऱ्या टाटा विश्वस्त संस्थेने आता शैक्षणिक क्षेत्रात एक नवा उपक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत अमेरिकेतील खान अकादमीशी करार करून भारतीय विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन शिक्षणाचा मंच खुला करून दिला आहे. भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ व उद्योजक सलमान खान हे अकादमीचे संस्थापक आहेत.
टाटा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष रतन टाटा यांनी खान अकादमीशी पाच वर्षांचा करार केल्याची घोषणा रविवारी केली. खान अकादमी अमेरिकेत ऑनलाइन शिक्षणासाठी प्रसिद्ध असून, सुमारे तीन कोटी विद्यार्थ्यांनी या अकादमीमार्फत अद्ययावत ज्ञान प्राप्त केले आहे. ना नफा-ना तोटा धर्तीवर या अकादमीचे कार्य चालते. आर्थिक जगतात एकेकाळी आघाडीवर असलेले सलमान खान या अकादमीचे संस्थापक आहेत.
रतन टाटा यांनी सांगितले की, मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण देण्याचा हा नवाच उपक्रम आहे. त्यामुळे अनेक वंचितांना शिक्षणाचा महामार्ग उपलब्ध होईल. जगाच्या पाठीवर कोणी कुठेही असला तरी त्याला मोफत शिक्षण व ज्ञान देण्याचे उद्दिष्ट खान अकादमीने ठेवले आहे. त्यामुळे खान अकादमीच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे. टाटा समूह शंभराहून अधिक वर्षे शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. त्याचा आधुनिक आविष्कार म्हणून खान अकादमीशी करार केला आहे. सामाजिक हिताच्या कामात टाटा समूह कधीच मागे राहिलेला नाही. कायद्यानुसार कंपन्यांना सामाजिक कार्यासाठी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी आम्ही ते आधीपासून करीत आहोत. नफ्यातील अडीच टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी देणे अपेक्षित आहे. पंरतु टाटा समूह सामाजिक कार्यावर नफ्यातील पाच टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम खर्च करीत आहे, समाजकार्य ही टाटा समूहासाठी नेहमीच आंतरिक गरज, कर्तव्य राहिलेले आहे, यात कधीही आम्ही समाजाच्या हिताचा विचार करतो, फायद्या-तोटय़ाचा विचार करीत नाही, असेही ते म्हणाले.
खान अकादमीचे सलमान खान यांनी या वेळी उपक्रमाची माहिती दिली. नफ्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवत नाही व याच उद्देशाने कार्यरत असलेल्या टाटा ट्रस्टचा सहयोग मिळणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी जी ऑनलाइन शैक्षणिक साधने दिली जातील त्यात नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रीसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेचे निकष डोळ्यापुढे ठेवले जातील. त्यात भाषांतरित आशयही दिला जाईल.
खान अकादमी ऑनलाइन शिक्षणासाठी प्रसिद्ध असून त्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमांचा लाभ तीन कोटी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतला आहे.