पश्चिम व मध्य रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू

मुंबई : वातानुकू लित लोकल गाडीला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ही सेवा यशस्वी ठरेल का, असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी पश्चिम व मध्य रेल्वेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण वातानुकूलित लोकल सध्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावत असतानाच अर्धवातानुकूलित लोकलचाही पर्याय समोर आला आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रवाशांना योग्य वाटतो, तसेच सामान्य लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल चालवणे योग्य आहे का, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यानुसार पर्याय देण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या पाच दिवसांत आतापर्यंत ४ हजार जणांनी मते नोंदविली आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावली. परंतु तीनही मार्गावरील लोकल गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सध्या करोनाकाळात पश्चिम रेल्वेवरच वातानुकूलित लोकलची सेवा सुरू असून मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग व ट्रान्स हार्बरवर या सेवा तात्पुरत्या बंद ठेवल्या आहेत. प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे या सेवेचा विस्तार करावा का, सध्याच्या वातानुकूलित लोकलमध्ये नेमके  काय बदल हवे यासाठी रेल्वेने वातानुकूलित लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षण सुरू केले आहे.

नमूद के लेल्या प्रश्नांमध्ये वातानुकूलित लोकल का हवी, प्रवाशांना संपूर्ण वातानुकूलित लोकल हवी की अर्धवातानुकूलित लोकल, असे विचारतानाच अर्ध वातानुकूलित लोकलमध्ये तीन डबे वातानुकूलित आणि नऊ डबे सामान्य हवे की सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे सामान्य अशी १२ डब्यांची लोकल हे पर्याय दिले आहेत. सामान्य लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल चालवणे योग्य आहे का, वातानुकूलित लोकलच्या भाडेदरात सुधारणा आवश्यक आहे का, यामध्ये प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी असावी का, असल्यास द्वितीय श्रेणीचे भाडे किती असावे यासह अन्य प्रश्न आहेत.

चार हजार मतांची नोंद

गेल्या पाच दिवसांपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४ हजार १०० जणांनी वातानुकूलित लोकलसंदर्भात मते नोंदविली आहेत. यात मध्य रेल्वेवरील दोन हजार आणि पश्चिम रेल्वेवरील २ हजार १०० जणांचा समावेश आहे. जास्तीत जास्त प्रवाशांची मते नोंदविली जावीत यासाठी सर्वेक्षण आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fully air conditioned or semi air conditioned local survey started from western and central railways akp
First published on: 22-06-2021 at 00:22 IST