मुंबई : मुंबई महापालिकेने गिरगाव, मुंबादेवी आणि आसपासच्या परिसरातील सोने – चांदीचे दागिने घडवणाऱ्या कारखान्यांवर तोडक कारवाई केली. सोने – चांदी गलाई व्यावसायिकांच्या बारा भट्टी, धुरांडी निष्कासित करण्याची कारवाई मुंबई महापालिकेच्या सी विभागाने केली. नागरी वस्त्यांमध्ये हे कारखाने असून वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील वायू प्रदूषणाला विविध गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. गिरगाव, मुंबादेवीसारख्या परिसरातील सोन्या – चांदीच्या कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळेही प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या सी विभाग कार्यालयाने हवेत धूर सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करून धुरांडी हटवली होती. त्यानंतर गुरुवारी पालिकेने अशीच मोठी कारवाई करून तब्बल १२ कारखान्यांवरील धुरांडी हटवली.

हेही वाचा – मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान

नागरी वस्तीत सोने – चांदी वितळवणाऱ्या भट्टींवर (गलाई व्यवसाय) आणि आम्ल भट्टींवर (ॲसिड फर्नेस) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. सी विभागातील पटवा चाळ आणि तेली गल्ली येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या गलाई व्यावसायिकांचे एकूण १२ धुरांडी (चिमणी) निष्कासित करण्यात आली. अशा प्रकारची कार्यवाही या पुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती सी विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच भरती, सुरक्षा अधिकाऱ्यांची १४०० पदे भरणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील गलाई व्यवसायाच्या छोट्या कारखान्यात सोने – चांदी वितळवण्यात येते. या कारखान्यात सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर करण्यात येतो. त्यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी / धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात कारवाई केली. याअंतर्गत बारा भट्टी, धुराडी हटविण्यात आले.