पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाख ९४ हजार ३५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यात मुंबईत सर्वाधिक एक लाख ८ हजार ६६ जागा रिकाम्या असून, विज्ञान शाखेच्या ८२ हजार ६२३ जागांवर प्रवेश झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहा शहरांतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. प्रवेशासाठी नियमित फेऱ्यांसह विशेष फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा एकूण आठ फेऱ्या राबवण्यात आल्या. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ही प्रवेश प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले. सहा शहरांतील एक हजार ६०५ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून ५ लाख ६० हजार ९६२ जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.

झाले काय?

यंदा अकरावीच्या प्रवेशांची सर्वाधिक चर्चा होती. राज्य मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्याने सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या तुलनेत कमी गुण असलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांपासून वंचित राहावे लागेल असे चित्र निर्माण झाले. त्यावरून बरेच वादविवादही झाले. तोडगा म्हणून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालये मिळण्यासाठी काही महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी उपलब्ध जागांची संख्या वाढली. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागा मुळातच जास्त असताना, त्यात १० टक्के वाढीव जागांची भर पडली. प्रवेश प्रक्रिया संपल्यावर या रिक्त जागांचा आढावा घेतला असता सहा शहरांमध्ये मिळून एक लाख ९४ हजार ३५७ जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून जागा फुगवटा वाढत आहे.

विभागनिहाय रिक्त जागा

मुंबई         १०८०६६

पुणे              ३६८५८

नागपूर         २६३९५

औरंगाबाद     १२८३१

अमरावती     ४४५१

शाखानिहाय रिक्त जागा

कला            ३६६४८

वाणिज्य      ६५४०५

विज्ञान         ८२६२३

व्यवसाय शिक्षण (एमसीव्हीसी) ९६८१

(इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक जागा रिक्त आहेत.)