मुंबई : संपूर्ण राज्यभरात यंदा पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या केंद्रिभूत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता शिक्षण क्षेत्रातून ग्रामीण भागात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन घेण्यास विरोध होऊ लागला आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या, विद्यार्थी व पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसणे, सायबर कॅफेसाठी लागणारे अतिरिक्त पैसे या अडचणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया राज्यभरात राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळामध्ये झालेल्या बिघाडामुळे विद्यार्थांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. या पद्धतीमुळे विद्यार्थी व पालक यांची ससेहोलपट होत आहे. पालकांना सक्तीने अँड्रॉइड फोन घ्यावा लागणार असून, महाविद्यालये सुरू व्हायलाही उशीर होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणताच फायदा होणार नसून उलट त्यांचे नुकसानच होणार आहे.
आर्थिक व शैक्षणिक नुकसान करणारी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची मुभा महाविद्यालयांना देण्यात यावी, अशी विनंती करत राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने ऑनलाईन पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी कोंडी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रामध्ये महासंघाने ऑनलाईन पद्धतीमुळे ग्रामीण भागाता येणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत.
महासंघाने मांडलेल्या अडचणी
१) ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव
२) आदिवासी व डोंगराळ भागातील विद्यार्थी किंवा पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही.
३) अकरावीतील उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
४) विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक संस्थांकडूनही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी नाही.
५) विद्यार्थी, पालक व शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीचे पुरेसे ज्ञान नाही
६) सायबर कॅफे व इतरांकडून अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लूट
७) उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांनी उपस्थित राहावे लागेल, मात्र त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
८) अकरावीचे वर्ग सुरू होण्यास विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
९) ऑनलाईन प्रक्रियेसाठी अकारण खर्च करावा लागत आहे.
१०) प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रिया खोळंबल्याने पालक व शिक्षकांना त्रास