मुंबई : दांडी यात्रा आणि गोलमेज परिषद या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील दोन महत्त्वाच्या घटना चित्रफीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जतन केल्या जाणार आहेत. गांधी फिल्म फाऊंडेशन आणि पिकल तंत्रज्ञान कंपनी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महात्मा गांधी यांचे काही काळ वास्तव्य असणाऱ्या ग्रॅण्ट रोड येथील मणी भवनात ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्सचे अध्यक्ष तसेच गांधी फिल्म फाऊंडेशनचे विश्वस्त उज्ज्वल निरगुडकर यांना या दोन्ही चित्रफिती सोमवारी पिकल या तंत्रज्ञान कंपनीकडून सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी पिकल संस्थेचे प्रतिनिधी रमेश बजाज आणि गांधी फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन पोद्दार उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आणि बायनरी कोड या तंत्रज्ञानाच्या मदतीने जतन केल्या जाणाऱ्या या पहिल्या चित्रफिती असणार आहेत. या चित्रफिती २० डिग्री तापमानात सहजरीत्या जतन होऊ शकतात. या चित्रफितीचा क्यूआर कोड तयार करून त्यावर गांधी फिल्म फाऊंडेशनचा मालकी हक्क असल्याचे नमूद केले आहे. देशाचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित असलेल्यांची माहिती पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास गांधी फिल्म फाऊंडेशनचे पोद्दार यांनी व्यक्त केला.

या दोन चित्रफितींच्या जतनासाठी युरोपीय देशांनी आर्थिक सहकार्य केले आहे. भारत सरकारने यासाठी आर्थिक सहकार्य करावे, अशी अपेक्षा पिकल संस्थेचे प्रतिनिधी रमेश बजाज यांनी व्यक्त केली आहे.

एक हजार वर्षे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा गांधी यांच्या  अनेक चित्रफिती गांधी फिल्म फाऊंडेशनकडे जतन केल्या जात आहेत. परंतु पिकल तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या बायनरी कोडच्या स्वरूपात एक हजार वर्षे जतन केल्या जाऊ शकतात. त्यासाठी निधी जमविला जात आहे, अशी माहिती निरगुडकर यांनी दिली.