मुंबई : राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेनेही उत्सवकाळात विविध सोयी – सुविधा उपलब्ध केल्या असून त्यासाठी गतवर्षी (२०२४-२५) महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर गेल्या १८ वर्षांमध्ये गणेशोत्सवातील सुविधांसाठी महापालिकेने २४७ कोटी रुपये खर्च केले आहेत. करोनाकाळापासून गणेशोत्सवातील सुविधांवरील खर्चात प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही राज्यभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच, सरकारने यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित केल्याने उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. देशातील विविध भागांतील हजारो भाविक काही प्रसिद्ध मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे उत्सव काळात विविध नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येतात. वाढती लोकसंख्या आणि काळानुसार सुविधा व त्यावरील खर्चातही वाढ होत आहे.

गतवर्षी महापालिकेने गणेशोत्सवातील विविध सुविधांसाठी तब्बल ५४ कोटी रुपयांचा खर्च केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याबाबत महापालिकेकडे माहिती मागितली होती. त्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून सदर बाब समोर आली आहे.

प्रकाशयोजना, रस्ते नियोजन, मंडप उभारणी, कृत्रिम तलाव आदी विविध सुविधांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. २००७ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत महापालिकेने उत्सवातील सुविधांसाठी तब्बल २४७.८१ कोटी रुपये खर्च केले आहेत. सर्वाधिक म्हणजेच ५४.४७ कोटी रुपये २०२४-२५ या वर्षात खर्च केले आहेत.

उत्सवांतील सुविधांसाठी २०२३-२४ मध्ये महापालिकेने ४९.१० कोटी रुपये, २०२२-२३ मध्ये ३१.१२ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र २०१८ – १९ मध्ये केवळ १०.२० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यांनतर २०२० -२१ मध्ये हा खर्च २२.८८ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

उत्सवकाळातील खर्च

वर्ष – खर्च (कोटींमध्ये)

२०१८-१९ – ९.७८

२०१९-२० – १०.२०

२०२०-२१ – २२.८८

२०२१-२२ – २४.४९

२०२२-२३ – ३१.१२

२०२३-२४ – ४९.१०

२०२४-२५ : ५४.४७