मुंबई : गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी शहरातील सुमारे ६० मंडळांनी कार्यशाळांमधून वाजतगाजत मूर्ती नेल्या. परिणाम लालबाग-परळ भागात अभूतपूर्व गर्दी आणि वाहतूक कोंडी अनुभवावी लागली.
गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाप्रमाणे मूर्ती मंडपात नेतानाही मिरवणुका काढण्याची प्रथा रूढ झाली आहे. रविवारी लालबाग-परळ परिसरातील कार्यशाळांमधून भव्य मूर्तींच्या मिरवणुका निघाल्या. परळ रेल्वे वर्कशॉपच्या मैदानातील गणेशमूर्ती कार्यशाळा व करीरोड जवळील ‘गणसंकुल’कार्यशाळेबाहेरच्या रस्त्यांवर दुतर्फा गर्दी पाहायला मिळाली. गर्दीमध्ये स्थानिकांपेक्षा मुंबईबाहेरील मंडळींचाच मोठा समावेश असल्याचे सांगितले जाते. रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू राहिल्यामुळे नागरिकांना विविध पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. अनेक वाहने तासन्तास एकाच जागी उभी असलेली पाहायला मिळाली.
परिस्थिती हाताळताना मुंबई पोलिसांच्या नाकीनऊ आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परळ, लालबाग व चिंचपोकळी परिसरात मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. स्थानिक पोलीस, सुरक्षारक्षक असे एकूण ३०० हून जवान तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियमन करण्यासाठी ५० अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमण्यात आले. तरीही लालबाग, परळ व चिंचपोकळीला जोडणाऱ्या मार्गिकांवर प्रचंड कोंडी होती. सयानी रोड, प्रभादेवी स्थानक, करी रोड मार्ग, चिंचपोकळी पूल यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. परळ ते लालबाग पुलाखाली डॉ.बी.ए. रोड येथून गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुका जात असल्याने दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ झाली होती. वाहनचालकांना चिंचपोकळी येथील सरदार जंक्शन, भारतमाता चित्रपटगृह, परळ जंक्शन येथून पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना पोलीस देत होते. दिवसभराच्या वाहतूक कोंडीनंतर रात्री ८.३०च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.
‘रील’वाल्यांचा ताप
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच सेल्फी घेणारे आणि रील बनविणाऱ्यांमुळे गर्दीत आणखी भर पडली. गणपतीचे रूप कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांची लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळताना पोलिसांवर दिवसभर ताण होता. अनेक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी रोखण्याचे कामही पोलिसांना करावे लागले. गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरांचाही सुळसुळाट होता. मोबाइल, पैशाची पाकिटे चोरीच्या अनेक घटना घडल्या.