मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’, ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ पाठोपाठ ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील सेवा कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत ‘मेट्रो १’ मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वर्सोवा – घाटकोपरदरम्यान प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना, भाविकांना दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान रात्री देखावे पाहण्यासाठी, तसेच गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक ठिकठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांना भेट देतात. या भाविकांना इच्छितस्थळी, घरी पोहचणे सोपे व्हावे यासाठी मेट्रो मार्गिकांवरील सेवा कालावधीत वाढ करण्यात येते. ‘मेट्रो १’ आणि ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील सेवा कालावधीत दरवर्षी वाढ करण्यात येते.
यंदा मुंबईत आणखी एका, ‘मेट्रो ३’ मार्गिकेची भर पडली. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील सेवा कालावधीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए), तर ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील सेवा कालावधीत मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) वाढ केली आहे. आता मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनेही (एमएमओपीएल) ‘मेट्रो १’च्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
‘मेट्रो १’ मार्गिकेवर सकाळी ५.३० ते रात्री ११.५० या वेळेत मेट्रो गाड्या धावतात. नियोजित वेळापत्रकानुसार वर्सोव्यावरून रात्री ११.२५ वाजता शेवटची गाडी, तर घाटकोपरवरून रात्री ११.५० वाजता शेवटची गाडी सुटते. या शेवटची गाडी अखेरच्या स्थानकादरम्यान सव्वाबारापर्यंत पोहचतात. पण गणेशात्सवातील ११ दिवसांमध्ये मेट्रो गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आल्याने सकाळी ५.३० ते रात्री १ दरम्यान मेट्रो १ ची सेवा सुरू राहणार असल्याची माहिती एमएमओसीएलकडून देण्यात आली.
एमएमओसीएलने दिलेल्या माहितीनुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान वर्सोव्यावरून शेवटची गाडी रात्री १२.४० वाजता सुटणार आहे. घाटकोपरवरून शेवटची गाडी रात्री १२.१५ वाजता सुटणार आहे. गाड्यांचा सेवा कालावधी वाढविण्यात आल्याने ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील एकूण फेऱ्या सहाने वाढणार असल्याचेही एमएमओसीएलने सांगितले. ‘मेट्रो १’च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळी वाढ झाल्याने प्रवाशांची, गणेशभक्तांची मोठी सोय होणार आहे.