आंतरराष्ट्रीय क्रेडीट कार्डाची माहिती चोरून त्या आधारे विमानाची तिकिटे घेऊन विकणाऱ्या एका टोळीतील चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने अटक केली आहे. परदेशी व्यक्तींच्या क्रेडीट कार्डाची माहिती चोरून त्याद्वारे ते विमानाची तिकिटे बुक करत असत. ही विमानाची तिकिटे नंतर कमी दरात विकली जायची.
दोन इसम इंडिगो हवाई कंपनीची तिकिटे आंतरराष्ट्रीय क्रेडीट कार्डाद्वारे ऑनलाईन नोंदणी करुन विकत घेत असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (अभियान) यांना मिळाली होती. त्या महितीच्या आधारे सापळा लावून पोलिसांनी तौफिक अहमद उर्फ रजबअली मिस्त्री आणि समीर कासिम शेख यांना अटक केली. तौफिक मिस्त्री याने त्याच्या मोबाईलवरुन ऑनलाईनने इंडिगो एअरलाईन्स कंपनीची वीस तिकीटे बुक केल्याचे स्पष्ट झाले. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल ४५ मोबाईल फोन, ४४ सीमकार्डसह ३ लॅपटॉप, ६ क्रेडीट कार्ड, डेटा कार्ड,हवाई तिकिटे आदी साहित्य जप्त करण्यात आले. हे दोघे ऑनलाईन तिकिटे बुक करुन मोहम्मद असलम मोहम्मद इसाक शेख याला देत असत. मोहम्मद शेख ही तिकिटे कमी दरात विकायचा. या टोळीतील चौथा आरोपी असद इस्माईल सय्यद हा क्रे म्डीट कार्डाची माहिती पुरवत होता. तो चांदिवलीतील एडीजी सव्‍‌र्हिसेस या कॉल सेंटर मध्ये काम करायचा. व्हायग्रा गोळ्या विकणे आणि त्याची माहिती देण्याचे काम हे कॉल सेंटर करते. या ठिकाणी येणाऱ्या परदेशी लोकांच्या क्रेडीट कार्डची माहिती तो चोरून आपल्या साथीदारांना देत होता. या टोळीत आणखी कोण सहभागी आहेत आणि कधीपासून ते हे काम करत होते, याचा पोलीस तपास करीत आहेत.