मुंबई : प्रेमभंग झालेल्या तरुणींना परत प्रेम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील कुख्यात टोळीतील दोन भामट्यांना गुन्हे शाखा २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. भामट्यांनी मुंबईतील १८ वर्षीय तरुणीशी इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरून संपर्क साधून तिच्याकडून विविध कारणांसाठी १६ लाख रुपये उकळले. हे पैसे देण्यासाठी तरूणीने आपल्याच घरात चोरी केली.

पायधूनी येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरात १ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. घराचा दारवाजा अर्धवट उघडा असताना अज्ञात चोरांनी आत प्रवेश करून घरातील २९ ग्राम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १६ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा २ चे पथक करीत होते. मात्र पोलिसांना या तक्रारीविषयी संशय होता. दार उघडे कसे राहिले ? सहज चोरी कशी झाली ? असे अनेक प्रश्न होते. पोलिसांनी मग फिर्यादी महिलेच्या १८ वर्षीय मुलीची चौकशी केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

प्रेमभंगामुळे इन्स्टाग्रामवर उपाय शोधला

या मुलीचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यानी ते संंबंध तोडायला लावले होते. यामुळे मुलगी अतिशय निराश झाली होती. इन्स्टाग्रामवर शोध घेत असताना तिला मौलाना इरफान खानजी या पेजवर एक जाहिराती दिसली. ‘दूर गेलेले प्रेम २४ तासात परत मिळवा’, ‘तुटलेले प्रेम परत मिळविण्याचे उपाय’ अशा स्वरूपाच्या जाहिरातींचा त्यात समावेश होता. वास्तविक ते सायबर भामट्यांनी पसरलेले जाळे होते. ही मुलगी त्या जाळ्यात अडकली आणि तिने जाहिराती दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. आरोपींनी तिला मौलवी असल्याचे भासवले. तिच्या प्रेमातील अडथळा दूर करायचा असेल तर काही विधी करावे लागतील आणि काही वस्तू आणाव्या लागतील, असे त्यांनी तिला सांगितले. त्यात चांदीची मटकी, सोन्याची माशी, सोन्याचा दिवा, हात्तातोडी वनस्पती, सोन्याचे खिळे आदींचा समावेश होता. पैसे दिले तर आम्ही या वस्तू आणून विधी करून आणि तुला तुझे प्रेम परत मिळवून देऊ, असा दावा भामट्याने केला होता.

घरातच केली चोरी

ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्याकडे एवढे पैसे नव्हते. परंतु ती या भामट्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. त्यामुळे तिला ते उपाय करायचे होते. मग तिने घरातच चोरी करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी घरता कुणीच नव्हेते. ती संधी साधून तिने घरातील सोन्याचे दागिने लंपास केले आणि घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. ही रक्कम तिने ऑनलाईन भामट्यांना पाठवली होते. सोन्याचे दागिने घेण्यासाठी आरोपी मुंबईत आले होते.

गंगापूरच्या भामट्यांना अटक

गुन्हे शाखा २ च्या पथकाने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले आणि तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. आरोपी राजस्थानमधील सायबर फसवणुकीसाठी कुप्रसिध्द असलेल्या गंगापूरचे असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास करून पोलिसांनी विकास मेघवाल (२२) आणि मनोज नागपाल (३०) या दोन भामट्यांना अटक केली. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील १३ लाख रुपये किंमतीचे १२९ ग्रॅम सोने आणि रोख ३ लाख १८ हजार रुपये जप्त केले. या भामट्यांच्या इन्स्टाग्रामवर अनेक तरुण – तरुणी फॉलोअर्स होत्या. अनेकांनी त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केले होते. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या अनेकांची त्यांनी अशाप्रकारे फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

या पथकाने केली कारवाई

गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मांजरे, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, तसेच उतेकर, तळेकर, पाडवी, बोरसे, थिमटे, डेरे, हरड, सय्यद, आव्हाड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून या भामट्यांना अटक केली. दरम्यान, समाजमाध्यमावरील अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.