मुंबई : देशभरात सायबर फसवणूक करून त्याद्वारे मिळालेली रक्कम विविध बॅंक खात्यात वळविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखा-२ च्या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ९४३ बॅक खाती शोधून काढली असून त्यात देशातील सायबर फसवणुकीची तब्बल ६० कोटींची रक्कम वळविण्यात आली होती. या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
कांदिवलीमध्ये ‘डीजी सर्ज कन्स्लटन्सी’ आण ‘प्रितीत लॉजिस्टीक’ या दोन कंपन्या कार्यरत आहेत. मात्र या कंपन्या बोगस असून त्या प्रत्यक्षात सायबर फसवणुकीसाठी बॅंक खाती तयार करण्याचे काम करीत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष २ च्या पथकाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी या कंपन्यांवर छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत वैभव पटेल, सुनील कुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबू सुंदरजळा, रितेश बांदेकर या आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ लॅपटॉप, २५ मोबाइल, वेगवेगळ्या बॅंकांचे २५ पासबूक, ३० धनादेश पुस्तिका ४६ एटीएम कार्ड, स्वाईप यंत्र, वेगवेगळ्या कंपनीचे १०४ मोबाइल सीमकार्ड जप्त करण्यात आले. त्यांच्याविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात कमल ३१८ (४) ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर केलेल्या तपासात अन्य १२ जणांना अटक करण्यात आली.
अशी करायचे फसवणूक
हे आरोपी आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग आहेत. ते ७ ते ८ हजारात बॅंकचे तपशील विकत घेऊन त्याआधारे बॅंक खाती तयार करायचे. त्यांनतर ती खाती सुरू करून सायबर फसवणुकीसाठी संबंधिताना पुरवत होते. सायबर भामटे फसवणुकीतून आलेली रक्कम या बॅंक खात्यात घेत होते. पोलिसांनी लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण केले असता ९४३ बॅंक खाती वापरण्यात आल्याचे आढळले. त्यापैकी १८१ बॅंक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर झाला होता. या खात्यांवर विविध फसवणुकीच्या ३३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात मुंबईतील १६, राज्यातील ४६, तर राज्यातील २७७ तक्रारींचा समावेश होता.
६० कोटी ८२ लाख ७५ हजारांची फसवणूक
डिटिजल अरेस्ट, गुंतवणूक, ऑनलाईन खरेदी आदी विविध प्रकारे लोकांची सायबर फसवणूक केली जाते. फसवणुकीची रक्कम या बनावट बॅंक खात्यात वळविण्यात येते. पोलिसांनी केलेल्या तपासात या बॅंक खात्यात देशभरातील फसवणूक केलेली ६० कोटी ८२ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम या खात्यात वळविण्यात आली होती. त्यापैकी मुंबईतील १ कोटी ६७ लाख ४४ हजार रुपये, तर राज्यातील १० कोटी ५७ लाख ३२ हजार रुपये फसवणुकीच्या रकमेचा समावेश आहे.
या पथकाने केली केली कारवाई
कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे प्रकटीकरण) राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-दक्षिण) दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, प्रशांत गावडे आदींच्या पथकाने केली.