लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानातळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या तीन भिन्न कारवायांमध्ये हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यात २ महिलांचाही समावेश आहे. तस्करी केलेल्या गांजाची एकूण किंमत सुमारे ३० कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपींविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. जेकब सर्कलमधील रहिवासी लक्ष्मण महाडिक (५९) आणि नालासोपाऱ्याच्या हर्षा छेडा (४७) अशी आरोपींची नावे आहेत. त्या दोघांच्या सामानात संशयित वस्तू असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यांच्याकडून प्रत्येकी ५९०४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. दोघांकडून मिळून एकूण ११ किलो ८०८ ग्रॅम गांंजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या कारवाईत भायखळा पश्चिम येथील रहिवासी नूर मोहम्मद बिलाखिया (४०) आणि आफरीन बिलाखिया (३६) या दाम्पत्याला सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर अडवले. आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्यांच्या सामानात ११ किलो ८०८ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सापडला असून त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये असल्याची महिती अधिकाऱ्यांनी दिली.

तिसऱ्या कारवाईत मुंबईतील ट्रॉम्बे येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद शफीक शेख (३४) याला बँकॉकहून ५.९० कोटी रुपये किंमतीचा हायड्रोपोनिक गांजा भारतात आणल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडील बॅगेमध्ये गांजा सापडला. त्याचे वजन केले असता तो ५९०४ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकॉकवरून आलेला ७५ कोटींचा गांजा जप्त

गेल्या दोन महिन्यात मुंबई विमानतळावरून ७५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एकाच कारवाईत पाच प्रवाशांकडून उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा पकडला होता. त्यांच्या बॅगेच्या तपासणीदरम्यान त ५६ किलो २६० ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा हायड्रोपॉनिक गांजाचा सापडला होता आंतरराष्ट्रीय विमानतळावर या गांजाची किंमत ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. आरोपींनी हिरव्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमधून गांजा लपवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमधून मोठ्याप्रमाणात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण होते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्ग मोठ्याप्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे दिसून आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्याप्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात विमानांची ये-जा असते. त्यामुळे बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी होत आहे. या तस्करीच भारतीय तस्करांचाच सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.